नवकार महामंत्र ऊर्जा स्रोत निर्माण करणारा   

पंतप्रधान नरेंद्र मोदी | चिंचवडमध्ये जीतोच्या वतीने विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त आयोजन

पिंपरी : श्री नवकार महामंत्रामध्ये एक आध्यात्मिक शक्ती आहे. या शक्तीचा मी अनुभव घेतला आहे. देश, विदेशात एकाच वेळी कोट्यावधी नागरिकांनी आज पठन केलेला नवकार महामंत्र सर्वांना ऊर्जा स्रोत निर्माण करणारा आहे. जेव्हा आपण हा मंत्र उच्चारतो, नमन करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आठ कर्मांचा क्षय होऊन मोक्ष प्राप्ती होते. १०८ दिव्य गुणांनी युक्त हा मंत्र आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 
 
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने बुधवारी विश्व नवकार महामंत्र दिवस भारतासह जगातील १०८ देशांमध्ये, ६००० पेक्षा जास्त ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शक केले. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टर फाउंडेशनच्या वतीने याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 
 
चिंचवड येथील कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, झोन चेअरमन राजेंद्र जैन, श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र मुथा, जितोचे शहर अध्यक्ष आनंद मुथा, सेक्रेटरी तुषार लुनावत, प्रकाश गादिया, दिलीप सोनिगरा, महिला अध्यक्ष पूनम बंब, मीना टाटिया, प्रदेश सेक्रेटरी तृप्ती कर्णावट, युथ अध्यक्ष सौरभ बेदमुथा, सेक्रेटरी अनुज चोपडा यांच्या सह शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व जैन बांधव मोठ्या संखेत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात सचिन धोका, हर्षद खिवंसरा, प्रितम दोशी, हेमंत गुगळे, दिलीप नहार,पराग कुंकुलोळ यांच्या सह इतर पदाधिकारी व सभासद यांनी योगदान दिले. स्वागत आनंद मुथा, आभार तुषार लुणावत यांनी मानले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अविश्वास, वैमनस्य, स्वार्थ यावर विजय मिळवण्यासाठी श्री नवकार महामंत्र प्रेरणा देतो. जेव्हा आपण स्वतःवर विजय मिळवू, तेव्हा आपण अरिहंत होऊ शकतो. भारतीय परंपरेत मौखिक रूपाने, शिलारूपाने नंतर प्राकृत भाषेत हा मंत्र पुढे सुरू आहे. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र आणि मोक्षाकडे जाणारा हा महामार्ग आहे. नवीन संसद भवनातही जैन धर्माचा प्रभाव दिसतो आहे. शार्दुलद्वारातून प्रवेश करतानाच याची अनुभूती येते, तेथे तीर्थंकरांची ऑस्ट्रेलिया मधून आणलेली मूर्ती आहे. छतावर भगवान महावीर आणि २४ तीर्थंकरांची प्रतिमा आहे. जैन धर्माचे साहित्य भारताच्या बौद्धिकतेचे मूळ आहे. हे ज्ञान प्राप्त करणे आपले कर्तव्य आहे. नवीन भारत ए आय च्या माध्यमातून आधुनिकतेशी जोडला जाईल आणि अध्यात्मिक मार्ग जगाला दाखवेल. जैन धर्म संवेदनशील आहे. युद्ध, आतंकवाद, पर्यावरण समस्या यावर विजय मिळवण्याचा मार्ग जैन धर्माच्या मुळात आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

Related Articles